राज्यातील पहिली स्वतंत्र पाळीव प्राणी स्मशानभूमी ठाणे–मिरा भाईंदर परिसरात उभारण्यात आली असून, ही प्राणीप्रेमींसाठी संवेदनशील व पर्यावरणपूरक अशी महत्त्वपूर्ण पायरी ठरली आहे. पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी योग्य सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा यापूर्वी विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून ही आवश्यक सुविधा प्रत्यक्षात आणली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाळीव प्राण्यांच्या मृतदेहाच्या अयोग्य विल्हेवाटीमुळे दुर्गंधी, प्रदूषण तसेच आरोग्याच्या दृष्टीने धोके निर्माण होत होते. या समस्यांवर तोडगा काढत आता मिरा–भाईंदर येथील नवघर, काशिमीरा तसेच ठाण्यातील माजिवडा गावात अत्याधुनिक गॅस-आधारित शवदाहिनी उभारण्यात आली आहेत. येथे नैसर्गिक वायू व प्रोपेन (एलपीजी)च्या सहाय्याने दहन प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे पारंपरिक लाकूड जाळण्यामुळे होणारे प्रदूषण टाळले जाते व पर्यावरणीय समतोल राखला जातो.
या उपक्रमाचे नागरिकांना होणारे लाभ
-
स्वच्छ इंधनावर आधारित पर्यावरणपूरक दहन प्रक्रिया
-
दुर्गंधी, प्रदूषण व आरोग्यधोके टाळण्यास मदत
-
पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक भावपूर्ण निरोप
हा उपक्रम कुटुंबे आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांमधील भावनिक नात्याचा सन्मान करतो तसेच स्वच्छता, करुणा आणि पर्यावरणाचा समतोल यांसारख्या मूल्यांना प्रोत्साहन देतो. पाळीव प्राणी स्मशानभूमी ही राज्यातील इतर शहरांसाठीही एक सकारात्मक आदर्श व मार्गदर्शक ठरेल.